महिला साहाय्यता कक्षाप्रमाणे पुरुषांनाही हवा आहे साहाय्यता कक्ष

0 5

नवी मुंबई : महिला साहाय्यता कक्षाप्रमाणे पुरुषांसाठी देखील साहाय्यता कक्षाची मागणी पुढे येऊ लागली आहे. अशा प्रकारच्या ११५ तक्रारी वर्षभरात पोलिसांकडे प्राप्त झाल्या आहेत. पती-पत्नीमध्ये वादाला प्रत्येक वेळी पुरुषालाच दोषी न धरता महिलांमुळे देखील कौटुंबिक वाद होत असून त्यात पुरुषांना मनस्ताप होत असल्याचे तक्रारदारांचे म्हणणे आहे.
महिलांवरील अत्याचार रोखण्यासाठी अथवा कौटुंबिक वाद मिटवण्यासाठी पोलिसांतर्फे महिला साहाय्यता कक्ष तयार करण्यात आलेला आहे. त्यांच्याकडे प्राप्त होणाऱ्या तक्रारींचा आकडा वर्षानुवर्षे वाढतच चालला आहे. मात्र या तक्रारींमध्ये काही पुरुष तक्रारदार देखील पुढे येवू लागले आहेत. गुन्हे शाखेच्या अंतर्गत असलेल्या या कक्षाकडे चालू वर्षात महिलांचे ५६५ तक्रार अर्ज प्राप्त झाले आहेत. त्यामध्ये हुंडाबळी, कामाच्या ठिकाणी स्त्रियांवर होणारे अत्याचार याशिवाय पती- पत्नीमधील वादांच्या प्रकारांचा समावेश आहे. अशा तक्रारी निकाली काढण्यासाठी महिला साहाय्यता कक्षामार्फत योग्य पद्धतीचा तपास करून महिलेसमोरील अडचणी सोडवण्याचा प्रयत्न केला जातो. अनेकदा सासू-सुना यांच्यातील किरकोळ वैचारिक मतभेद देखील पती-पत्नीला टोकाची भूमिका घ्यायला कारणीभूत ठरतात. यामुळे घटस्फोटाची देखील प्रकरणे घडत आहेत. असे प्रकार टाळण्यासाठी कुटुंबातील सदस्यांचे समुपदेशन करून सामंजस्याने वाद मिटवले जातात.
परंतु कौटुंबिक वादाला प्रत्येक वेळी पती अथवा सासरच्या व्यक्तीच कारणीभूत असे गृहीत धरणे चुकीचे असल्याचेही काही पतींचे म्हणणे आहे. काही महिला कायद्याने मिळालेल्या संरक्षणाचा दुरुपयोग करून पती व सासरच्या व्यक्तींचाच छळ करत असल्याचाही त्यांचा आरोप आहे. त्यानुसार चालू वर्षात महिला साहाय्यता कक्षाकडे कौटुंबिक वादातून प्राप्त झालेल्या ५६५ तक्रारींमध्ये ११५ तक्रारी पत्नी पीडित पुरुषांच्याही आहेत. पत्नीच्या आई-वडिलांचा संसारात हस्तक्षेप, पत्नीकडून होणारा मनस्ताप, सासू-सासºयांकडे दुर्लक्ष करणे अशा अनेक कारणांचा त्यात समावेश आहे. अशा तक्रारींचा निपटारा करण्यासाठी पोलिसांनी महिला साहाय्यता कक्षाप्रमाणेच पुरुष साहाय्यता कक्षाची देखील सुरवात करण्याची मागणी त्यांनी केली आहे.