बेपत्ता रिक्षा चालकाचा १८ दिवसानंतर आढळला सडलेला मृतदेह, आत्महत्येचा संशय

0 7

नांदेड – भाजीपाल्याचे वाहतूक करण्यासाठी शेतात गेलेला रिक्षा चालक १८ दिवसांपूर्वी शेतातून बेपत्ता झाला होता. त्यानंतर बुधवारी त्याचा सडलेल्या अवस्थेतील मृतदेह रुई शिवारात एका झाडाला लटकलेल्या स्थितीत आढळून आला आहे. बालाजी परघणे (वय- ४५, रा. नेवरी, ता. हदगांव) असे त्या रिक्षा चालकाचे नाव आहे.

बालाजी हा रिक्षा चालवून आपल्या कुटुंबाची उपजिवीका करत होता. त्याची सासुरवाडी रुई (धा.) असल्यामुळे तेथेच राहत असे. सुमारे १८ दिवसांपूर्वी तो रुई शिवारातील आनंदराव कदम यांच्या शेतातील भाजीपाल्याची वाहतूक करण्यासाठी तो आपली रिक्षा घेवून शेतात गेला. मजुरांचे भाजीपाला काढून रिक्षात ठेवण्याचे काम सुरू असतानाच तो अचानक कुठे तरी निघून गेला. बराच वेळ पाट पाहूनही तो आला नसल्यामुळे शेवटी कदम यांनी इतर वाहनाची व्यवस्था करुन भाजीपाला बाजारात विक्रीला नेला. त्या दिवसापासून ती रिक्षा १८ दिवस उलटले तरी  त्याच ठिकाणी उभी होती. 

दरम्यान, काही दिवसांपूर्वी त्या भागात गुरे चारणाऱ्या गुराख्यांना काही तरी सडण्याचा वास येत होता. परंतु मृतदेह अत्यंत दाट झाडीत असल्यामुळे कोणालाही तो दिसत नव्हता. बुधवारी सकाळी काही ग्रामस्थांच्या मदतीने झाडीत जाऊन पाहणी केली असता, त्या ठिकाणी झाडाला लटकलेल्या अवस्थेत एक मृतदेह आढळला. यानंतर माधव कदम यांनी मयताचा मेव्हणा माधव विठ्ठल वाढवे यास मोबाईलवरुन या घटनेची माहिती दिली. वाढवे यांनी मृतदेहावरील कपड्यावरुन तो मृतदेह बालाजी परघणे यांचा असल्याचे ओळखले. यानंतर पोलिसांनी या घटनेची माहिती देण्यात आली. पोलीस घटनास्थळी दाखल झाल्यानंतर प्रेताचा जाग्यावरच पंचनामा आणि शवविच्छेदन करुन नातेवाईकांना मृतदेह सोपवण्यात आला. माधव वाढवे यांनी दिलेल्या माहितीनुसार, हदगांव पोलीस ठाण्यात या घटनेची आकस्मित मृत्यू अशी नोंद करण्यात आली आहे.