बॅनरच्या माध्यमातून काँग्रेसच्या अंतर्गत गटबाजीसह जनसंघर्ष यात्रेवर भाजपची टीका

0 54
जिल्ह्यात गुरुवापासून काँग्रेसच्या जनसंघर्ष यात्रेला सुरुवात होणार आहे. यासाठी जय्यत तयारी केल्या जात आहे. गेल्या काही दिवसांत काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस बी.आर.कदम यांना नांदेड काँग्रेसमधून एकटे पाडले जात आहे. राहुल गांधी यांची ओळख असतानाही त्यांना या भेटीपासून दूर ठेवल्याच्या बातम्या काही वृतपत्रात झळकल्या. तसेच राज्य व केंद्र स्तरावरील अंतर्गत गटबाजी दिसून येत आहे. या सर्व बातम्यांची कात्रणे एकत्र करुन भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष भास्करराव पाटील खतगावकर यांनी बॅनर लावून चांगलीच फोडणी देऊन चर्चेला वाचा फोडली आहे.भोकर विधानसभा मतदार संघात कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती बी.आर.कदम यांना गतवेळी उमेदवारी देण्यावरुन चांगलेच शह -कटशाहचे राजकरण रंगले होते.  २० ऑक्टोबर रोजी तेलंगणाला जाण्यापूर्वी काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी नांदेड विमानतळ येथे भेट ही दिली. त्यांनी काही मोजक्या कार्यकर्त्यांसोबत जेवण घेतले. मात्र, कदम त्या कार्यकर्त्यांमध्ये नव्हते. यासंदर्भातील काही बातम्या वृत्तपत्रात छापून आल्या होत्या. हाच धागा पकडत  भाजपाने बॅनरबाजी करुन संघर्ष यात्रेवर टिका केली आहे. या बॅनरमध्ये एक वृतपत्रात आलेली ‘नांदेडच्या ओळखीचा माणूस राहुल गांधी पासून दूर’ या मथळ्याखाली असलेली बातमी व काँग्रेसच्या अंतर्गत गटबाजी संदर्भाने केंद्र व राज्य स्तरावरील बातम्याचे कात्रण छापत बॅनर तयार केले आहे. त्यात हा ‘कसला जनसंघर्ष- हा तर काँग्रेसचा अंतर्गत संघर्ष’ असा मथळा छापत जिल्ह्यातील विविध भाजप नेत्यांचे फोटो टाकण्यात आले आहेत. जनहितार्थ प्रकाशित करत असल्याची टिप्पणी भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष माजी खासदार भास्करराव पाटील खतगांवकर यांनी जोडली आहे. प्रकाशक म्हणून चैतन्यबापू देशमुख व भारतीय जनता पक्ष म्हणून छापण्यात आले आहे.