प्रलंबित मागण्यांसाठी कंत्राटी सफाई कामगारांचे मनपासमोर 15 पासून बेमुदत आंदोलन

नांदेड/प्रतिनिधी-नांदेड वाघाळा शहर महानगरपालिका अंतर्गत काम करणार्‍या कंत्राटी सफाई कामगारांनी मार्च 2017 चे थकीत वेतन, किमान वेतनानुसार वेतन व इतर मागण्यांसाठी येत्या 15 ऑक्टोबर पासून बेमुदत आंदोलन करण्यात येईल, असा इशारा मराठवाडा नगरपालिका महानगरपालिका कामगार कर्मचारी युनियनच्यावतीने आयुक्तांना देण्यात आलेल्या निवेदनात दिला आहे. कंत्राटी सफाई कामगारांना किमान वेतन कायद्यानुसार वेतन अदा करावे, शासन परिपत्रक दि.22 जानेवारी 2016 ची अंमलबजावणी करावी, माहे मार्च 2017 चे थकीत वेतन तातडीने वाटप करावा, रात्र पाळीतील कामगारांचे थकीत वेतन अदा करावे, कामगार कायद्यानुसार कंत्राटी कामगारांना आठवडी सुट्टी लागू करावी. अन्यथा सुट्टीचा पगार द्यावा, गमबुट, ऍप्रॉन, मास्क, झाडू आदी साहित्य कामगारांना पुरवावे, मागील सर्व कंत्राटदारांनी कपात केलेले पीएङ्ग एकत्रित करुन कामगारांच्या खात्यात वर्ग करावेत, कंत्राटी सङ्गाई कामगारांना इएसआयचे ओळखपत्र तत्काळ वाटप करावे, हजरी कार्ड तत्काळ वाटप करावे. आदी मागण्या गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित आहेत. यावर 14 ऑक्टोबरपूर्वी अंमलबजावणी न झाल्यास 15 ऑक्टोबरपासून बेमुदत आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा या निवेदनात देण्यात आला आहे.
या निवेदनावर कॉ.प्रदीप नागापूरकर, कॉ.के.के.जांबकर, कॉ.शिवाजी फुलवळे, कॉ.शांताबाई पवळे, कॉ.वंदना वाघमारे, कॉ.वैशाली धुळे, कॉ.मिना हटकर, कॉ.लता हटकर, कॉ.वंदना गोडबोले आदींच्या स्वाक्षर्‍या आहेत.
Leave a comment