पुण्यात निवडणूक अधिकारी म्हणतो भाजपाला मत द्या, पोलिसांनी घेतले ताब्यात

पुण्यातील कसबा विधानसभा मतदारसंघात निवडणूक अधिकारी मतदान केंद्रावर येणाऱ्या मतदारांना भाजपाला मत द्या, असे आवाहन करत असल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे. या प्रकरणी पोलिसांनी निवडणूक अधिकाऱ्याला ताब्यात घेतले आहे.

कसबा विधानसभा मतदारसंघात श्री शिवाजी मराठा हायस्कूल आणि कनिष्ठ महाविद्यालयात मंगळवारी मतदान सुरु होते. यादरम्यान एका वृद्ध मतदाराला मतदान केंद्रावरील निवडणूक अधिकाऱ्याने भाजपाला मतदान करा, असे आवाहन केल्याचा आरोप आहे. याची माहिती काही मतदारांनी पुण्यातील काँग्रेस उमेदवार मोहन जोशी यांना दिली. जोशी यांनी देखील घटनास्थळी पोहोचून अधिकाऱ्याला जाब विचारला.पोलिसांनी संबंधित अधिकाऱ्याला चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. संबंधित कर्मचाऱ्याला कार्यमुक्त करण्यात आले असून चौकशी करून तथ्य आढळल्यास कार्यवाही करण्यात येईल अशी माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी नवल किशोर राम यांनी दिली.