पालकांनो सावधान! लहान मुलांची मेमरी पावर कमी होण्याचं हे असू शकतं कारण!

0 19

भारतीय लहान मुलांच्या रक्तात शिसं अधिक प्रमाणात असल्याने त्यांच्या बौद्धिक क्षमतेवर वाईट प्रभाव होऊ शकतो. याच कारणाने वेगवेगळ्या आजारांचीही समस्या होऊ शकते. एका नव्या शोधातून ही बाब समोर आली आहे. ऑस्ट्रेलियामध्ये मॅकक्वेरी विश्वविद्यालयाच्या संशोधकांनी भारतीयांच्या रक्तातील शिशाचं प्रमाण याबाबत पहिलं मोठं विश्लेषण केलं आहे. या विश्लेषणातून आढळलं की, आजारांचा धोका आधीच्या तुलनेत अधिक वाढला आहे. याचा लहान मुलांच्या बौद्धिक क्षमतेवर नकारात्मक प्रभाव पडतो. मॅकक्वेरी विश्वविद्यालयाचे ब्रेट एरिक्सन म्हणाले की, भारतात राहणाऱ्या लहान मुलांच्या बौद्धिक क्षमतेवर होणारा दुष्परिणाम गंभीर आहे. त्यांच्या रक्तात शिशाच्या मिश्रणाचं प्रमाण साधारण ७ मायक्रो ग्रॅम प्रति डेसीलिटर आहे. अभ्यासकांनी सांगितले की, भारतीयांच्या रक्तात शिशाचं प्रमाण वाढण्याचं कारण बॅटरी रिसायकल क्रिया आहे. भारतात बॅटरी रिसायकल प्रक्रियेची व्यवस्था फार वाईट आहे.

एरिक्सन म्हणाले की, ‘भारतात मोठ्या प्रमाणात लोक मोटरसायकल किंवा कार चालवतात. या वाहनांच्या बॅटरीचं लाइफ हे केवळ दोन वर्ष असतं. लेड बॅटरींचा वापर अधिक प्रमाणात केला जातो. या बॅटरी दरवर्षी रिसायकल केल्या जातात. पण त्या योग्य पद्धतीने रिसायकल केल्या जात नाही’.अभ्यासकांनी सांगितले की, आयुर्वेदिक औषधी, आयलायनर, नूडल्स आणि मसालेसहीत अनेक आणखीही काही पदार्थ आहेत जे लहान मुलांच्या रक्तात शिशाचं प्रमाण वाढवतात.