नांदेड-तिरुपती रॉयलसीमा एक्सप्रेस लवकरच सुरु होणार-खा.चिखलीकर

नांदेड/प्रतिनिधी-नोंदडकरांची गेल्या अनेक दिवसापासून प्रलंबीत असलेली मागणी नांदेड-तिरुपती रॉयलसीमा एक्सप्रेस रेल्वे लवकरच सुरु करण्याचे आश्‍वासन दक्षिण मध्य रेल्वेचे जनरल मॅनेजर गजानन मल्ल्या यांनी दिले असल्याची माहिती नांदेडचे भाजपा खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी दिली आहे.

नांदेड लोकसभा मतदारसंघाचे खा.प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या नेतृत्वाखाली भाजपा पदाधिकार्‍यांचे एक शिष्टमंडळ दक्षिण मध्य रेल्वेचे जनरल मॅनेजर गजानन मल्ल्या यांची सोमवार दि.20 जानेवारी रोजी दुपारी रेल्वेच्या सिकंदराबाद येथील कार्यालयात भेट घेवून मागण्याचे निवेदन दिले. त्यावेळी रॉयलसीमा एक्सप्रेस रेल्वेचे लवकरच नांदेडपर्यंत विस्तार केला जाईल असे आश्‍वासन गजानन मल्ल्या यांनी शिष्टमंडळास दिले.

या शिष्टमंडळात भाजपाचे जिल्हाध्यक्ष व्यंकटराव पाटील गोजेगांवकर, भाजपाचे महानगराध्यक्ष प्रविण साले, रविंद्र पोतगंटीवार, विजय गंभीरे, देगलूरचे नगरसेवक प्रशांत दासरवार, उबयनलाल यादव, हाजारी आदिंचा समावेश होता.

खा.चिखलीकर यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने दक्षिण मध्य रेल्वेचे जनरल मॅनेजर गजानन मल्ल्या यांची सोमवारी सिकंदराबाद येथील रेल्वेच्या कार्यालयात भेट घेवून सध्या सुरु असलेली निजामाबाद-तिरुपती रॉयलसीमा एक्सप्रेस ही रेल्वे नांदेडहून तिरुपतीला सोडण्यात यावी. खा.चिखलीकर यांच्या प्रयत्नामुळे सध्या दररोज सुरु झालेल्या नांदेड-पनवेल या रेल्वे गाडीचे रेणुकामाता रेल्वे असे नामकरण करण्यात यावे. विशाखापट्टणम व नरसापूर रेल्वेचा थांबा उमरी-धर्माबाद रेल्वे स्थानकावर देण्यात यावे. नांदेड-मनमाड-पुणे ही आठवड्यातून दोन दिवस सुटणारी रेल्वे दररोज सुरु करण्यात यावी. नांदेडहून मनमाडला जाणार्‍या तीन पॅसेंजर रेल्वे सध्या नगरसोलला थांबतात तरी या तीन्ही रेल्वे मनमाड स्थानकापर्यंत सोडण्यात यावे. रेल्वेमध्ये मुदखेडहून फुलाची वाहतुक करण्यास रेल्वे प्रशासनाने घातलेली बंदी उठवून फुल वाहतूकीस परवानगी देण्यात यावी तसेच नांदेडहून पंढरपूर, कोल्हापूर, वैष्णदेवी, कन्याकुमारी या तिर्थक्षेत्र स्थळासाठी प्रवाशांच्या मागणीनुसार विशेष रेल्वे सुरु करण्यात यावे आदि मागण्याचे निवेदन सादर केले.
खा.चिखलीकर यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने दिेलेल्या मागण्यांचा सहानुभूतीपूर्वक विचार करुन दक्षिण मध्य रेल्वेचे जनरल मॅनेजर गजानन मल्ल्या यांनी रॉयलसिमा एक्सप्रेस लवकरच नांदेडपर्यंत सुरु करण्याचे आश्‍वासन देवून शेतकर्‍यांना रेल्वेतून फूलांची वाहतुक करण्यास परवानगी देण्यात येईल. येत्या मार्च पर्यंत मुदखेड ते परभणीपर्यंतचे दुहेरी रेल्वे मार्गाचे काम पूर्ण करण्यात येईल. नव्यानेच सुरु झालेली नांदेड-मुंबई राज्य राणी एक्सप्रेसला वाढीव रेल्वे बोगी जोडण्याचा विचार रेल्वे प्रशासनाने सुरु केला असल्याचे आश्‍वासन मल्ल्या यांनी दिले असल्याचे खा.चिखलीकर यांनी कळविले आहे.