नांदेड जिल्ह्यातील 14 महसूल मंडळात दुष्काळ घोषित विविध सवलती लागू
नांदेड, दि. 1 :- जिल्ह्यातील 14 महसूल मंडळामध्ये दुष्काळ घोषित करण्यात आला असून त्याठिकाणी विविध सवलती लागू करण्यात आल्याचा आदेश जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांनी निर्गमीत केला आहे.या आदेशात नमूद म्हटले आहे की, महाराष्ट्र शासन महसूल व वनविभाग मंत्रालय मुंबई यांचेकडील शासन निर्णय 6 नोव्हेंबर 2018 नुसार नांदेड जिल्ह्यातील 14 महसूल मंडळात जून ते सप्टेंबर 2018 या कालावधीत तालुक्याच्या सरासरी पर्जन्याच्या 75 टक्के पेक्षा कमी व एकुण पर्जन्यमान 750 मिमी पेक्षा कमी झाले आहे. अशा 14 महसूल मंडळात दुष्काळ घोषित करण्यात आला आहे.बिलोली तालुक्यात – बिलोली, सगरोळी, कुंडलवाडी, आदमपूर. लोहा- लोहा. हदगाव- मनाठा, किनवट- इस्लापूर, जलधरा, शिवणी. धर्माबाद- करखेली, जारीकोट. नायगाव- कुंटूर, नरसी, मांजरम या 14 महसूल मंडळाचा समावेश आहे.
या ठिकाणी पुढील सवलती लागू राहतील. जमीन महसूलात सुट, सहकारी कर्जाचे पुनर्गठन, शेतीशी निगडीत कर्जाच्या वसुलीस स्थगिती, कृषी पंपाच्या चालू विजबिलात 33.5 टक्के सुट, शालेय / महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या परिक्षा शुल्कात माफी, रोहयो अंतर्गत कामाच्या निकषात काही प्रमाणात शिथिलता, आवश्यक तेथे पिण्याचे पाणी पुरविण्यासाठी टँकर्सचा वापर, टंचाई जाहीर केलेल्या गावात शेतकऱ्यांच्या शेतीच्या पंपाची वीज जोडणी खंडीत न करणे. संबंधीत विभाग प्रमुखांनी जिल्ह्यातील 14 महसूल मंडळामध्ये दुष्काळ जाहीर करण्यात आलेल्या गावातील खातेदारांना या उपाययोजना व सवलती देण्याची व्यवस्था करावी, असेही आदेशात नमूद केले आहे.