नांदेड:वृद्ध माता-पित्यांचा छळ केल्याप्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल
द्वारकादास बच्चेवार (वय, ८०) असे पीडित पित्याचे नाव आहे. बच्चेवार यांचे विवेकनगर येथे घर आहे. द्वारकादास बच्चेवार हे सेवानिवृत्त आहेत. ते आपल्या पत्नी रेणुका यांच्यासह मुलगा राजेश बच्चेवार यांच्याकडे राहतात. द्वारकादास बच्चेवार यांनी मुलाचा योग्य रीतीने सांभाळ करीत त्याला लहानाचे मोठे केले, लग्न लावून दिले. परंतु, आता वृद्ध माता-पित्यांची सुनेला अडचण होत आहे.द्वारकादास बच्चेवार यांनी बांधलेल्या घरापासून जवळपास १५ ते २० हजार रुपयांचे भाडे येते. परंतु, असे असताना मुलगा राजेश बच्चेवार आणि त्याची पत्नी ज्योती बच्चेवार यांनी द्वारकादास बच्चेवार आणि त्यांची पत्नी रेणुका यांचा छळ केला. वयोवृद्ध माता-पित्यांचा सांभाळ न करता त्यांना शिवीगाळ करुन जिवे मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी द्वारकादास बच्चेवार यांनी दिलेल्या तक्रारीवरुन भाग्यनगर पोलीस ठाण्यात राजेश बच्चेवार याच्या विरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे. या संपूर्ण प्रकरणाचा तपास पोलीस निरिक्षक अनिरुद्ध काकडे करीत आहेत.