नांदेड:नागरिकत्व सुधारणा कायद्याविरोधात आता महिला उतरल्या आंदोलनात

सरकार विरोधी घोषणांनी परिसर दणाणून गेले

नांदेड (प्रतिनिधी) -नागरिकत्व सुधारणा कायदा मागे घ्यावा या मागणीसाठी दि. 13 जानेवारी पासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत धरणे आंदोलन सुरु करण्यात आले आहे. आंदोलनाचा आज 4 था दिवस असून या आंदोलनात आजपासून महिलांनी सहभाग नोंदविण्यास सुरुवात केली आहे.

केंद्र सरकारने नागरिकत्व सुधारणा कायदा लागू केला असून या काळ्या कायद्याविरोधात मागील चार दिवसापासून सर्वपक्षीय आंदोलन सुरु करण्यात आले आहे. या आंदोलनात चार दिवस केवळ पुरुषांपुरते मर्यादीत होते. परंतु आता या कायद्याचा विरोध करण्यासाठी महिलांही पुढे येवू लागल्या आहेत.

आज दुपारी 2 ते 5 या वेळेत शहरातील खडकपुरा, गंगाचाळ, पक्कीचाळ येथील महिलांनी उत्स्फुर्तपणे सहभाग नोंदवला. यापुढे देखील महिलांचा सहभाग राहणार आहे. कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न लक्षात घेता दररोज वेगवेगळ्या मर्यादीत भागातून महिला आंदोलनात सहभागी होणार असल्याचे सांगण्यात आले.

तसेच उद्या दि. 17 जानेवारी रोजी अंध व अपंग आंदोलन करणार असल्याचे माहिती देण्यात आली. कुल जमाती तहरिक चया वतीनी हे बेमुद्दत धरणे आंदोलन सुरू करण्यात आले आहे. सकाळी आठ ते रात्री दहा वाजेपर्यंत हे आंदोलन होणार आहेत. या आंदोलना मध्ये विविध सामाजिक आणि राजनीतिक संघटनांनी आपला पाठिंबा जाहीर केला आहे.