गुरूद्वारा बोर्डाच्या अध्यक्षपदी स्थानिकांची निवड करा

0 6
भाजपाच्या स्थानिक नेत्यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

नांदेड/प्रतिनिधी.सचखंड गुरूद्वारा बोर्डाचे अध्यक्ष आ.तारासिंग यांनी राजीनामा दिला असल्याने त्यांच्या रिक्त झालेल्या जागेवर स्थानिक व्यक्तीची निवड करावी अशी मागणी भाजपाच्या स्थानिक नेत्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.शीख समाजाची काशी म्हणून ओळखल्या जाणार्‍या नांदेड येथे सचखंड गुरूद्वारा तख्थची देशभरात ओळख आहे. सचखंड गुरूद्वारा बोर्डाच्या अध्यक्षपदी भाजपाचे आ.तारासिंग यांची नियुक्ती करण्यात आली होती. मात्र गेल्या महिन्यात आ.तारासिंग यांनी आपल्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर हे पद रिक्त झाले आहे. नांदेड येथे सचखंड गुरूद्वारा असल्याने या बोर्डाच्या अध्यक्षपदी नांदेडच्या स्थानिक व्यक्तीची निवड झाल्यास हा कारभार अधिक उत्तमरित्या चालविता येईल. नांदेड-दिल्ली नवी विमानसेवा सुरू झाली असल्याने नांदेडला येणार्‍या शीख भाविकांच्या संख्येत आणखी वाढ होणार आहे. जगभरातून येणार्‍या शीख बांधवांच्या प्रवासासाठी, गुरूद्वारा दर्शनासाठी, तीर्थक्षेत्राच्या भेटीसाठी त्यादरम्यान निर्माण होणार्‍या समस्या, अडीअडचणी सोडविण्यासाठी त्या समजून घेण्यासाठी आणि तातडीने उपाययोजना करण्यासाठी स्थानिक नेतृत्त्व अधिक प्रभावी ठरू शकते या शिवाय स्थानिक नेतृत्त्वाची निवड केल्यास भारतीय जनता पार्टीला आगामी निवडणुकीत शीख समाज बांधवांचा मोठा पाठींबा मिळून भाजपा भक्कम होईल, भाजपा आगामी निवडणुका आणखी मोठ्या मनुष्यबळाच्या ताकदीने लढेल यामुळे गुरूद्वारा बोर्डाच्या अध्यक्षपदी नांदेडच्या स्थानिक शीख बांधवांची नियुक्ती करावी अशी मागणी भाजपाचे प्रदेश उपाध्यक्ष माजी खा.भास्करराव पाटील खतगावकर, आ.राम पाटील रातोळीकर, महानगराध्यक्ष डॉ.संतुकराव हंबर्डे, माजी आ.ओमप्रकाश पोकर्णा, प्रदेश कार्यकारिणी सदस्य ऍड.चैतन्यबापू देशमुख यांनी केले आहे.

विमानसेवेबद्दल सरकारचे आभार
नांदेड-दिल्ली नवी विमानसेवा सुरू करून प्रवाशांना मोठी संधी उपलब्ध करून देण्यात आली. सचखंड गुरूद्वारा दर्शनासाठी येणार्‍या शीख बांधवांचा प्रवास अधिक सुखकर केला. शीख बांधवांच्या भावना समजून घेवून केंद्र सरकारने नांदेड-दिल्ली ही नवी विमानसेवा सुरू करून मोठे सहकार्य केले आहे. सरकारच्या या ऐतिहासीक कामगिरीबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय उड्डाण मंत्री यांचे आभार भाजपाचे प्रदेश उपाध्यक्ष माजी खा.भास्करराव पाटील खतगावकर, आ.राम पाटील रातोळीकर, महानगराध्यक्ष डॉ.संतुकराव हंबर्डे, माजी आ.ओमप्रकाश पोकर्णा, प्रदेश कार्यकारिणी सदस्य ऍड.चैतन्यबापू देशमुख यांनी मानले आहेत