अर्धापूर तालुक्यातील गणपूर गावात रात्री दरोडेखोरांनी एक घर लुटले

0 10
अर्धापूर-वसमत रोडपासून जवळच असलेल्या गणपूर गावात संभाजी मोहिते यांच्या घरात त्यांचे कुटुंबीय झोपलेले होते.  १६ नोव्हेंबर रोजी पहाटेच्या सुमारास दरोडेखोरांनी गावापासून थोडे दूर असलेल्या मोहिते यांच्या घरात प्रवेश केला. तिथे १ वृद्ध दाम्पत्य व लहान बालके होती. दरोडेखोराकडे रॉड, कोयता व चाकूसारखी शस्त्रे होती. चोरांनी या सर्वांना मारहाण करून घरातील कपाट फोडून त्यातील सोन्या-चांदीचे दागिने तसेच रोख रक्कम, असा एकूण १ लाख ७१ हजार रुपयांचा ऐवज लुटला. या दरोडेखोरांनी संभाजी मोहिते यांच्यावर धारधार शस्त्राने मारहाण केली. यात त्यांच्या उजव्या हाताला गंभीर दुखापत झाली. घडलेल्या घटनेची माहिती मिळताच अर्धांपूर पोलीसांसह स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस पथक घटना स्थळी पोहोचले. अप्पर पोलीस अधीक्षक डॉ. अक्षय शिंदे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरिक्षक सुनील निकाळजे, सहाय्यक पोलीस निरिक्षक पांडुरंग भारती, महादेव मांजरमकरसह अनेक पोलीस कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी भेट दिली. यावेळी श्वान पथकाला पाचारण करण्यात आले होते. दरोडेखोरांना लवकरच जेरबंद करू, असे सहाय्यक पोलीस निरिक्षक महादेव मांजरमकर यांनी सांगितले आहे. याप्रकरणी अर्धापूर पोलीस ठाण्यात अज्ञात दरोडेखोरांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान या दरोड्यांमुळे परिसरात प्रचंड भीतीचे वातावरण पसरले आहे.